
Badlapur Sexual Assault Case Update : अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. हा एन्काऊंटर ( Akshay Shinde Encounter ) हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप शरद पवारांपासून सगळेच विरोधी पक्षनेते करत आहेत. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?
अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार ( Akshay Shinde Encounter ) केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.